Home update गडचिरोलीत ‘छात्रो की गुंज’ची महा मॅरेथॉन; १० हजारांहून अधिक युवक-युवतींचा सहभाग

गडचिरोलीत ‘छात्रो की गुंज’ची महा मॅरेथॉन; १० हजारांहून अधिक युवक-युवतींचा सहभाग

0
8

ॲड. दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण
गडचिरोली, ता. १३: काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ उपक्रमातून प्रेरणा घेऊन खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्रपरिवाराच्या वतीने गडचिरोली येथे  महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विदर्भातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा हजारांहून अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.
गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच विदर्भातील विविध भागांतून युवक-युवती या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. युवकांमध्ये आरोग्य, क्रीडा आणि सकारात्मक ऊर्जेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, ॲड. दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी, उपलब्ध शैक्षणिक संधी आणि करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई अलाम, ॲड. कविता मोहरकर, नगरसेवक सतीश विधाते यांच्यासह विविध तालुक्यांचे पदाधिकारी, युवक-युवती, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here