Home update एटापल्ली पोलिसांची अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई

एटापल्ली पोलिसांची अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई

0
2
एटापल्ली पोलिसांची अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई
२ ट्रक आणि ८८ गोवंशीय जनावरांसह ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; आठवडाभरात सलग चौथी मोठी कारवाई
गडचिरोली, ता. २६ : एटापल्ली पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन ट्रक आणि ८८ गोवंशीय जनावरांसह एकूण ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या आठवडाभरात कोटगुल, कुरखेडा आणि एटापल्ली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीविरोधात झालेली ही सलग चौथी मोठी कारवाई असून, या कारवायांमध्ये आतापर्यंत १४५ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार एटापल्ली पोलिसांचे पथक २५ ऑगस्टच्या रात्री शहरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक एटापल्लीमार्गे जाणार आहे. या माहितीच्या आधारे आलेंगाटोला येथील कसनसूर-आलापल्ली मार्गावर पोलिसांनी सापळा रचला.
२६ ऑगस्टच्या पहाटे संशयित ट्रक येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालकाने गुरुपल्ली येथे ट्रक सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले. तपासणी केली असता ट्रकमध्ये ४० गोवंशीय जनावरे कोंबून भरल्याचे आढळले.
दरम्यान, याच मार्गावरून आणखी एक ट्रक अवैध गोवंश वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पुन्हा सापळा रचला. पोलिसांचा अडथळा दिसताच दुसऱ्या ट्रकच्या चालकानेही वाहन सोडून जंगलात पलायन केले.
पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत पहिल्या ट्रक क्रमांक TS 08 UB 5779 मध्ये ४० गोवंशीय जनावरे, तर दुसऱ्या ट्रक क्रमांक AP 16 TE 1238 मध्ये ४८ गोवंशीय जनावरे आढळली. दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख रुपये असून, जनावरांची एकूण किंमत १३ लाख २० हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अज्ञात वाहनचालक व मालकांविरुद्ध एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६९/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here