कोईंदुळ गावातील संतापजनक वास्तव; रुग्णवाहिकाही पोहोचेना, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप
गडचिरोली,ता.२८: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प केला जात असतानाच एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोईंदुळ गावातील एका गरोदर भगिनीला मात्र रुग्णालय गाठण्यासाठी अक्षरशः जीवघेणा संघर्ष करावा लागला. नाल्यांवर पूल नसल्याने आणि पुरामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू न शकल्याने ग्रामस्थांनी या गरोदर महिलेला खाटेवर झोपवून पुरातून बाहेर काढल्याची घटना आज घडली.
कोईंदुळ हे एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गाव असून, गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. दोन नाले पार करुन गावात जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी छाया सुरेश नैताम(२६) गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णवाहिकाही पाठवली. मात्र, नाल्यांना पूर आल्याने रुग्णवाहिकेला गावात पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत गरोदर महिलेला खाटेवर झोपवून कावडीच्या साहाय्याने पुरातून दोन्ही नाले पार केले. त्यानंतर पलीकडे आलेल्या रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात नेण्यात आले. आरोग्यसेविकाही सोबत होत्या.
पावसाळ्यात दरवर्षी अशाच प्रकारच्या अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी २० जुलैला पुष्पा परसा या गरोदर महिलेला आणि इतर वेळी अन्य रुग्णांनाही नाले पार करून उपचारासाठी नेण्याची वेळ आली होती. वारंवार मागणी करूनही पूल आणि पक्क्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी समोर आलेले हे दृश्य दुर्गम भागातील आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधांच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे
आ.विजय वडेट्टीवार यांचा तीव्र संताप
काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आज नियोजित पत्रकार परिषदेत कोईंदूळच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. रक्षाबंधन हा बहिणीने भावाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा आणि भावाने तिच्या सुरक्षेची हमी घेण्याचा हा पवित्र सण आहे. परंतु याच दिवशी एका गर्भवती भगिनीला नाल्यातून जीव मुठीत घेऊन जावं लागत असेल आणि सत्ताधारी मंडळी स्वत:ला भाऊ म्हणवून घेत असतील, तर सत्ताधाऱ्यांना भगिनींच्या सुरक्षिततेशी चिंता आणि तिच्या वेदनेची जाणीव आहे काय, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. कोणत्याही गर्भवतीला पुरातून प्रवास करावा लागू नये, एवढी संवेदनशीलता जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.










