दुसरी मुलगी ऑक्सिजनवर, २४व्या आठवड्यातच प्रसूती
गडचिरोली,ता.३०: एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोईंदूळ येथून स्ट्रेचरवर झोपून दोन नाले पार करत दवाखान्यात नेण्यात आलेल्या गर्भवती महिलेने हेडरी येथील खासगी दवाखान्यात जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी चिमुकली ऑक्सिजनवर असल्याची माहिती आहे.
कोईंदूळ येथील छाया सुरेश नैताम (२६) हिला २८ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता प्रसववेदना जाणूव लागल्या. गावालगतचे दोन नाल्यांना पूर असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत येऊ शकली नव्हती. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आरोग्य सेविका व आशा वर्करच्या मदतीने तिला स्ट्रेचरवर झोपवून पूर आलेले दोन नाले पार केले. रक्षाबंधनाच्या दिवशीच गर्भवती भगिनीला वेदनादायी प्रवास करावा लागल्याच्या घटनेने दुर्गम भागातील रस्ते आणि पुलाचा प्रश्न चर्चेत आला होता. पुढे तोडसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी हेडरी येथील लॉयडस् कालीअम्मल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास छाया नैताम हिची प्रसूती झाली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र एक मुलगी मृत आढळली.
गर्भधारणेचा सामान्य कालावधी सुमारे ४० आठवड्यांचा असतो. परंतु छाया नैताम यांची २४ व्या आठवड्यातच प्रसूती झाली. परिणामी जन्माच्या वेळी एका बाळाचे वजन ७०० ग्रॅम, तर दुसऱ्या बाळाचे वजन केवळ ६०० ग्रॅम होते. ७०० ग्रॅम वजनाची मुलगी पोटातच दगावली, तर ६०० ग्रॅम वजनाच्या दुसऱ्या मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. बाळासह मातेवर तज्ज्ञांच्या निगराणीखाली उपचार सुरु असून,सध्या मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली.










